एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

Mumbaiमालाड (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेरील आनंद रोडवरील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला दोन वर्षे उलटूनही परमानंद हॉटेलसमोरील ‘बॉटल नेक’ अद्याप कायम असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या अडथळ्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, रस्ता रुंदीकरणाचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळत नसल्याची टीका होत आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते विनोद पांडुरंग घोलप यांनी पी (पश्चिम) विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांना निवेदन सादर करून संबंधित अडथळा तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी आनंद रोडचे रुंदीकरण केले. मात्र, परमानंद हॉटेलसमोरील अरुंद भाग कायम राहिल्याने बेस्ट बसेस, रिक्षा, दुचाकी, खासगी वाहने तसेच पादचाऱ्यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढताना अडथळे निर्माण होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, परिसरातील इतर अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली असली तरी परमानंद हॉटेलसमोरील अडथळा अद्याप कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विनोद घोलप यांनी हा प्रश्न जनहिताशी संबंधित असल्याचे सांगत, आनंद रोड पूर्ण रुंदीने वाहतुकीस खुला करण्यासाठी ‘बॉटल नेक’ तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीवर त्वरित कारवाई न केल्यास स्थानिक नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.