पहिल्याच सरीत मालवणीत रस्त्यावर पाणी साचले..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी वॉर्ड क्रमांक ३४ मधील गेट क्रमांक ३, परिसरातील साने गुरुजी वसाहतीत नुकत्याच करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर पावसाच्या पहिल्याच सरीत पाणी साचल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ३१ मे २०२६, रोजी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, रस्ता असमतोल असल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरांसमोर साचत असल्याचे चित्र दिसून आले.
साचलेल्या घाण पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत असून, वाहनांच्या हालचालीमुळे कपड्यांवर चिखल व घाण पाणी उडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्याच पावसात ही परिस्थिती निर्माण झाल्याने, मुसळधार पाऊस सुरू झाल्यास नुरी चाळ तसेच साने गुरुजी वसाहत ब्लॉक क्रमांक ३ मधील घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
या प्रकारामुळे पालिकेच्या रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रस्ता असमतोल कसा राहिला, काम सुरू असताना संबंधित कंत्राटदारासोबत देखरेख करणारे पालिकेचे अभियंते काय करत होते, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
निकृष्ट दर्जाच्या या कामाची जबाबदारी नेमकी कंत्राटदाराची की संबंधित अधिकाऱ्यांची, याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या तातडीने दूर करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *