४४ वर्षांनंतर शालेय मित्रांचा स्नेहमेळावा; जुन्या आठवणींना उजाळा.

Share

एसएम्एस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.


न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रेच्या १९८२ च्या दहावी ‘ग’च्या माजी विद्यार्थ्यांचे पुनर्मिलन उत्साहात

मुंबई : शाळा सुटली, वाटा बदलल्या, प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात रमला; मात्र मैत्रीचे ऋणानुबंध कायम राहिले. याच नात्यांचा प्रत्यय न्यू इंग्लिश स्कूल, वांद्रे येथील १९८२ च्या दहावी ‘ग’च्या माजी विद्यार्थ्यांच्या ४४ वर्षांनंतर झालेल्या स्नेहसंमेलनातून आला. ६ सप्टेंबर रोजी आयोजित या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रमैत्रिणींनी मनमुराद आनंद लुटला.

पुण्यात स्थायिक झालेल्या राजेश शिरोलकर याच्या संकल्पनेतून सचिन मळेकर, राजेश खानविलकर आणि राजेश गावडे यांच्या सहकार्याने या पुनर्मिलनाची तयारी सुरू झाली. २३ मे रोजी ‘10जी -एनईएस -1982’ हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. वर्गाच्या हजेरीपटावरील ५७ विद्यार्थ्यांपैकी संपर्कात आलेल्या ३४ जणांना या उपक्रमाशी जोडण्यात आले.

या स्नेहमेळाव्यासाठी मीना आणि देवेंद्र हे दोन वर्गमित्र अमेरिकेतून आले, तर अलिबाग, पुणे आणि अहिल्यानगर येथूनही काही जण खास उपस्थित राहिले. सरस्वतीवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवंगत शिक्षक आणि दोन वर्गमित्रांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर प्रत्येकाने आपला जीवनप्रवास, संघर्ष, यश आणि कौटुंबिक अनुभव कथन केले. सरकारी सेवा, अभियांत्रिकी, खासगी क्षेत्र, राजकारण, व्यवसाय आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत माजी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचे अनुभव ऐकताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

सामूहिक भोजनानंतर गाण्यांवर आधारित मनोरंजक खेळ आणि नृत्यामुळे वातावरण अधिक रंगले. सायंकाळी निरोप घेताना पुन्हा भेटण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात होती. एका मित्राने दिलेल्या स्नेहभेटीने या दिवसाच्या आठवणी अधिक संस्मरणीय केल्या.

अद्याप संपर्कात न आलेल्या वर्गमित्र-मैत्रिणींचा शोध सुरू असून, त्यांना या वृत्तांताद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील स्नेहसंमेलन सहकुटुंब आयोजित करण्याचेही नियोजन आहे.

चार दशकांहून अधिक काळानंतर पुन्हा जुळलेले मैत्रीचे बंध आता अधिक दृढ झाले असून, या भेटीने सर्वांना जुन्या आठवणींसोबत नव्या उत्साहाची अनमोल भेट दिली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *