एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
पश्चिम रेल्वेच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांची गैरसोय; जुने वेळापत्रक लागू करण्याची मागणी
मुंबई : चर्चगेटहून सुटणाऱ्या दोन जलद मालाड लोकल गाड्यांना जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांवर पुन्हा थांबा देण्यात यावा, अशी मागणी प्रवासी व वाहतूक मदत संघटनेचे (PATRA) सचिव मन्सूर उमेर दरवेश यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.
चर्चगेटहून रात्री ९.०५ आणि ९.४३ वाजता सुटणाऱ्या या दोन्ही मालाड जलद लोकल गाड्यांना यापूर्वी अंधेरीनंतर जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांवर थांबा देण्यात येत होता. मात्र, १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलेल्या नव्या वेळापत्रकात या दोन्ही स्थानकांवरील थांबे बंद करण्यात आले आहेत.
यामुळे जोगेश्वरी आणि गोरेगाव परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन जलद लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्थानकांवरील थांब्याचा लाभ मिळत होता. थांबे बंद झाल्याने प्रवाशांना अतिरिक्त प्रवास करावा लागत असून वेळ आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकांवर थांबा देऊन जुने वेळापत्रक लागू करावे, अशी मागणी दरवेश यांनी रेल्वे प्रशासना कडे केली आहे.