
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई : कांदिवली, सह्याद्रीनगर परिसरातील रयत शिक्षण संस्था संचलित प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाने ISO 9001:2015 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन यशस्वीरीत्या प्राप्त केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या मानांकन प्रक्रियेदरम्यान मुख्याध्यापिका शिल्पा जरे यांनी आयएसओकडून आलेल्या निर्धारकांना शाळेतील सर्व सोयीसुविधा, शैक्षणिक उपक्रम आणि व्यवस्थापनाची सुसूत्रता यांचे सविस्तर सादरीकरण केले. शाळेतील आधुनिक सुविधा—रेन वॉटर हार्वेस्टिंग, सॅनिटरी पॅड इन्सिनरेटर, वेस्ट वॉटर मॅनेजमेंट, सोलर पॅनेल्स तसेच प्रत्येक वर्गात बसवलेले इंटरॅक्टिव पॅनल्स—यांची निर्धारकांनी विशेष प्रशंसा केली.
यासोबतच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयाचे दिले जाणारे प्रशिक्षणही उल्लेखनीय असल्याचे नमूद करण्यात आले. विद्यालयाची फी अत्यंत माफक असल्याचेही मुख्याध्यापिकांनी स्पष्ट केले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सहसचिव बी. एन. पवार तसेच स्कूल कमिटी सदस्य प्रशांत दादा पाटील, संगीता पाटील व मदनराव चव्हाण यांनी अभिनंदन केले. सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या परिश्रमांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
तसेच विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे व सहविभागीय अधिकारी विलासराव जकात यांनीही विद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक केले.
विद्यालयाने मिळवलेले हे आयएसओ मानांकन म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुयोग्य व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे सर्व स्तरांतून अधोरेखित करण्यात येत आहे.