विशेष प्रतिनिधी
मानवाधिकार कार्यकर्ते दिवंगत फादर स्टॅन स्वामी यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी वांद्रे येथे आयोजित अभिवादन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुसळधार पावसाची परिस्थिती असूनही सभागृह खचाखच भरले होते.
यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मिहिर देसाई यांनी सांगितले की, “बनावट पोलिस चकमक म्हणजे केवळ निःशस्त्र व्यक्तीवर गोळीबार करणे नव्हे. एखाद्या वृद्ध आणि अशक्त व्यक्तीला खोट्या गुन्ह्यात अटक करून, त्याच्या प्रकृतीची जाणीव असूनही तुरुंगात डांबणे आणि त्यातून त्याचा मृत्यू ओढवेल हे माहीत असतानाही कारवाई करणे, हेदेखील बनावट चकमकीचेच एक रूप आहे.”
इरफान इंजिनिअर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, फादर स्टॅन स्वामी हे जंगलातील नैसर्गिक संसाधने आणि खाण उद्योगाच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाविरोधात ठामपणे उभे राहिले. आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांच्या धोरणांसमोर भक्कम अडथळा ठरले होते.
यावेळी तीस्ता सेटलवाड आणि शाकीर शेख यांनी फादर स्टॅन स्वामी यांच्या जीवनकार्याचा, संघर्षाचा आणि सामाजिक योगदानाचा आढावा घेत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
ही स्मृतिसभा बॉम्बे कॅथोलिक सभा, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम, एपीसीआर, पीयूसीएल, सीजेपी, मुंबई फॉर पीस आणि ख्रिश्चन डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. सभेत अॅड. मिहिर देसाई, तीस्ता सेटलवाड, शाकीर शेख (एपीसीआर) आणि इरफान इंजिनिअर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ‘सिटिझन्स फॉर डेमॉक्रसी’चा एकात्मतेचा संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातील सहआरोपींकडून प्रसिद्ध करण्यात आलेले निवेदनही उपस्थितांसमोर वाचण्यात आले. फादर स्टॅन स्वामी यांच्या स्मरणार्थ त्यांनी ५ जुलै रोजी उपोषणाचे आयोजन केल्याची माहितीही देण्यात आली.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी संविधान, लोकशाही आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आवाज उठविण्याचा निर्धार व्यक्त केला. संविधानिक मूल्यांचे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून समाजात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. अन्यायाविरोधात मौन बाळगण्याऐवजी सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.