बोरिवली–बांदा स्लीपर कोच सेवा तातडीने सुरू करा.. 

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बोरिवली ते बांदा ही स्लीपर कोच बस सेवा मागील दोन वर्षांपासून कोणतेही ठोस कारण न देता अचानक बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर परिसर व कोकणातील हजारो प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर तसेच नवी मुंबई परिसरात रोजगार, शिक्षण व व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या हजारो कोकणवासीयांसाठी बोरिवली–बांदा स्लीपर कोच सेवा ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था मानली जात होती. सण-उत्सव, सुट्ट्या तसेच आपत्कालीन परिस्थितीत कोकणात जाण्यासाठी या सेवेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद असतानाही ही सेवा अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांना खाजगी बससेवांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.

विशेषतः वरिष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. खाजगी वाहतूक सेवांमधील वाढलेले दर आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) कडे सदर बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती.

जनतेच्या भावना व अडचणी लक्षात घेऊन मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) व कोकण जनविकास समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नॅन्सी डेपो, बोरिवली येथे भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी बोरिवली–बांदा स्लीपर कोच बस सेवा तसेच बोरिवली–मालवण बस सेवा तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.

एसटी महामंडळाचे अधिकारी श्री. जाधव यांनी शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करत सदर बस सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

“सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सुलभ व परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे ही शासनाची सामाजिक जबाबदारी आहे. कोकणवासीयांच्या भावना व गरजा लक्षात घेऊन ही सेवा तातडीने सुरू करण्यात यावी,” अशी भूमिका कोकण जनविकास समितीचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, प्रकाश जाधव तसेच मासचे कार्याध्यक्ष दिनेश राणे, उपाध्यक्ष डॉ. उत्तम महाडकर, उपाध्यक्षा चित्रा राणे, कार्यकारिणी सदस्य रमेश बोरीचा तसेच नितांत पेडणेकर, दीपेश परब यांनी मांडली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *