मालवणीत शौच टाकी तुंबली; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे

मालाड पश्चिम येथील आझमी नगर, गेट क्रमांक ७, गौसिया मस्जिद जवळील चाळीतील शौचालयाची टाकी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील महिनाभरापासून येथील रहिवासी या समस्येचा सामना करत असून, घाण पाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना घरात राहणेही कठीण झाले असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

या समस्येबाबत स्थानिक रहिवासी संगीता सिंह यांनी २ जुलै रोजी पालिकेच्या पी/उत्तर परिरक्षण विभागाकडे तक्रार केली होती. तसेच त्यांनी वॉर्ड क्रमांक ३३ चे कनिष्ठ अभियंता भूषण पाटील यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली असल्याचे सांगितले.

कनिष्ठ अभियंता भूषण पाटील यांनी मलनिःसारण वाहनासाठी संबंधित कर्मचारी सचिन चौधरी यांचा संपर्क क्रमांक दिल्यानंतर संगीता सिंह यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र, मलनिःसारण वाहन दुरुस्तीसाठी असल्याचे सांगण्यात आले. वाहन कधी दुरुस्त होईल याबाबत विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना पुन्हा माहिती दिल्यानंतर चलान भरण्याचे सांगण्यात आले. तसेच मोठे मलनिःसारण वाहन रस्ता अरुंद असल्यामुळे आझमी नगर परिसरात जाऊ शकत नसल्याचे आणि छोटी गाडी दुरुस्तीसाठी गेल्याचे सांगण्यात आले.

“मी बघतो आणि कळवतो. मात्र छोटी गाडी दुरुस्तीसाठी गेली आहे. आमच्याकडे एकच छोटी गाडी आहे. ती दुरुस्त होऊन आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.”
— भूषण पाटील, कनिष्ठ अभियंता, पी/उत्तर विभाग

दरम्यान, “मागील महिनाभरापासून शौच टाकी भरल्यामुळे आम्ही त्रस्त आहोत. वारंवार तक्रार करूनही पालिका अधिकारी आमच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. या समस्येमुळे आमच्या कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल रहिवासी संगीता सिंह यांनी उपस्थित केला आहे.

पालिका पी उत्तर विभागात जवळपास पाच लाखाहून अधीक लोक वस्ती असलेल्या मालाड विधानसभा क्षेत्रात आणि पालिकेच्या पी उत्तर विभागात एकच मलनिःसारण वाहन असल्याने रहिवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता पालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शौच टाकीची समस्या सोडवावी, नाहीतर लोकशाही माध्यमातून आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.


Share

One thought on “मालवणीत शौच टाकी तुंबली; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *