लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, सहा.आयुक्त नितीन शुक्ला अटकेत.

Share

एसएमएस-प्रतिनिधी -सुरेश बोरले.

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला (३८) यांना लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिका प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुक्ला आणि तक्रारदार महिला हे दोघेही विक्रोळी येथील बिल्डिंग प्रपोझल विभागात कार्यरत असताना एकमेकांच्या संपर्कात आले. या काळात दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.

तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, शुक्लाने त्याचे वैवाहिक संबंध चांगले नसल्याचे सांगून पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे सांगितले. तसेच तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने त्याच्यासोबत संबंध ठेवले.
मात्र, कालांतराने शुक्ला लग्नाचा विषय टाळत असल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. तिच्या तक्रारीच्या आधारे विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अन्वये गुन्हा नोंदवून शुक्ला यांना अटक केली.
सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत असून प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता आणि नंतर त्यांची पूर्णवेळ सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.
एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *