एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शासकीय धान्य पुरवठ्याचे काम खासगी ठेकेदारांमार्फत करण्याच्या हालचालींमुळे सुमारे दहा हजार माथाडी कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ २५ आणि २६ मे रोजी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय माथाडी संघटनांनी घेतला आहे.
शासकीय धान्य गोदामांमध्ये धान्याची चढ-उतार करणे, गोदाम व रेशन दुकानांमध्ये पोत्यांच्या थप्प्या लावणे आदी कामे जिल्हा माथाडी मंडळातील नोंदणीकृत कामगारांकडून केली जातात. राज्यभरात अशा कामगारांची संख्या दहा हजारांहून अधिक असल्याची माहिती अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस अरुण रांजणे यांनी दिली.
मात्र शासनाने २१ आणि २४ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशांनुसार, रेशन दुकानांना थेट धान्य पुरवठा करण्यासाठी खासगी वाहतूक कंत्राटदारांच्या माध्यमातून कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये धान्याच्या पोत्यांची वाहतूक, वजन करणे, उतराई आणि दुकानांमध्ये थप्पी लावण्याची कामे अनोंदित कामगारांकडून करून घेण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
यामुळे भविष्यात शासकीय गोदामांमध्ये धान्य येणे कमी होऊन नोंदणीकृत माथाडी कामगार बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात शासकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत माथाडी स्वरूपाची सर्व कामे नोंदणीकृत कामगारांकडूनच करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.
“आतापर्यंत खासगी मालकांकडून माथाडी कायद्याचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आता सरकारच कामगारांचे कायदेशीर संरक्षण काढून घेण्याच्या भूमिकेत दिसत आहे,” अशी टीका अरुण रांजणे यांनी केली.
या आंदोलनात महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी मंडळ, अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक आणि जनरल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन आदी संघटना सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.