एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई,रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील वडघर येथे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकातर्फे १ व २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला ‘वर्षारंग’ हा आगळावेगळा पावसाळी उपक्रम महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे १५० सहभागींच्या उत्स्फूर्त सहभागात आनंदात पार पडला.
उपक्रमाची सुरुवात ‘साने गुरुजी जीवनदर्शनी’ने झाली. या प्रदर्शनातून सहभागींसमोर साने गुरुजींचे जीवनकार्य, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि “जगाला प्रेम अर्पावे” हा त्यांचा मानवतावादी संदेश उलगडण्यात आला. त्यांच्या विचारांची, मूल्यांची आणि जीवनदृष्टीची प्रेरणादायी ओळख करून देत कार्यक्रमाला अर्थपूर्ण सुरुवात झाली.
कोकणातील पारंपरिक भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोकणातून सहभागी स्मारकात दाखल झाले होते. तीन वर्षांच्या बालकांपासून ते ८३ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील निसर्गप्रेमींनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, जेन झी (Gen Z) पिढीच्या तरुण-तरुणींचा मोठा सहभाग लक्षवेधी ठरला. त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण शिबिराला वेगळे चैतन्य लाभले.
‘वर्षारंग’मधील भातलावणी हा केवळ कृषी अनुभव नसून अन्नदाता शेतकरी आणि कृषिकर्मी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संस्कार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सहभागीांनी पारंपरिक पद्धतीने भातलावणी करत श्रमसंस्कार, शेतीसंस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते प्रत्यक्ष अनुभवले.
भातलावणीबरोबरच रानभाज्यांच्या पारंपरिक भोजनाचा आस्वाद, पावसाळी कविता-गाणी, चिखलातील खेळ आणि मैत्रीपूर्ण संवाद यामुळे उपक्रमाला अधिक रंगत आली.
संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बिरवाडी (महाड) येथील जिजाऊ भजनी मंडळाच्या महिला तसेच वनप्रेमी सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरणविषयक गीते सादर करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ॲड. किशोर पवार यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमात भिवघर येथील कातकरी महिलांनी पारंपरिक भातलावणीची गीते आणि नृत्य सादर करून कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.
दुसऱ्या दिवशी सकाळी पर्यावरण अभ्यासक मल्हार इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मारक परिसरात निसर्गभ्रमंती आयोजित करण्यात आली. या भ्रमंतीत सहभागींसमोर परिसरातील जैवविविधता, विविध वनस्पती, पक्षी आणि स्थानिक पर्यावरणीय वैशिष्ट्यांची माहिती मांडण्यात आली. जैवविविधतेचे संवर्धन आणि निसर्गाशी नाते दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
दोन दिवसांच्या ‘वर्षारंग’ उपक्रमामुळे सहभागी भारावून गेले. शहरातील धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडून ग्रामीण जीवन, श्रमसंस्कार आणि निसर्गाशी नव्याने नाते जोडण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हा अनुभव आयुष्यभर स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त करत साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
उद्घाटनप्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर, जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. संजय मं. गो., स्मारकाच्या विश्वस्त प्रा. शारदा गांगुर्डे, विश्वस्त सिरत सातपुते तसेच रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रतीक पवार उपस्थित होते.