
मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीची फेरी बोट सेवा काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते शनिवार, २६ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत फेरी बोट सेवा बंद राहणार आहे.
गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची गर्दी होत असल्याने बोटी लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. तसेच गर्दीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीने कळविले आहे.
या कालावधीत प्रवाशांनी फेरी बोट सेवेचा वापर करू नये तसेच प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.