एका मुलाच्या कलेतून दुसऱ्या मुलाच्या शिक्षणाला आधार!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

 १६ वी क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धेत ४४७ विद्यार्थ्यांचा सहभाग; विजेत्यांचा गौरव

मुंबई :एका मुलाच्या कलेतून दुसऱ्या मुलाच्या शिक्षणाला हातभार लागावा, या सामाजिक उद्देशाने टच (TOUCH – Turning Opportunities for Upliftment and Child Help) संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली १६ वी क्रिएटिव्ह टच चित्रकला स्पर्धा दादर पूर्व येथील सदाकांत धवन मैदानावर उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विविध शाळांमधील ४४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.

‘चाइल्ड टू चाइल्ड हेल्प’ अर्थात एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला मदत, या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, माणुसकी आणि सहकार्याची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी साकारलेली चित्रे संस्थेच्या सामाजिक कार्यासाठी योगदान म्हणून दिली जातात. या चित्रांच्या माध्यमातून वंचित आणि गरजू मुलांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळतो.

इयत्ता चौथी ते सहावी, सातवी ते नववी आणि दहावी ते बारावी अशा तीन गटांत स्पर्धा घेण्यात आली. आयसीएसई, सीबीएसई, एसएससी तसेच शासकीय, महानगरपालिका आणि खासगी शाळांतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे परीक्षण करून उत्कृष्ट कलाकृतींची निवड केली.

कार्यक्रमात टच बालग्राम, विहीगाव येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, भावगीते, पोवाडा, मल्लखांब आणि रोप मल्लखांब यांचे सादरीकरण केले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांसह आत्मविश्वास आणि जिद्दीचे दर्शन घडविले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

टच संस्थेच्या माध्यमातून आदिवासी, ग्रामीण, वंचित आणि रस्त्यावरील मुलांच्या शिक्षण, संगोपन व सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. या कार्याला समाजातील इतर मुलांनीही हातभार लावावा, या उद्देशाने क्रिएटिव्ह टच स्पर्धेचे आयोजन सातत्याने केले जाते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक, शिक्षक आणि हितचिंतकांनी विशेष मेहनत घेतली.

### स्पर्धेतील विजेते

**इयत्ता चौथी ते सहावी**

– प्रथम : संयुक्ता विकास तरे (सहावी)

– द्वितीय : अदयान गुलजार शेख (सहावी)

– तृतीय : प्रसाद तांबारे (पाचवी)

– उत्तेजनार्थ : तनिष्का परब (सहावी)

**इयत्ता सातवी ते नववी**

– प्रथम : अंश प्रवीण तावडे (नववी)

– द्वितीय : खुशी संतोष चौकेकर (नववी)

– तृतीय : संतोष जी. विश्वकर्मा (आठवी)

– उत्तेजनार्थ : कौस्तुभ समीर कांसे (सातवी)

**इयत्ता दहावी ते बारावी**

– प्रथम : स्वरा विकास तरे (दहावी)

– द्वितीय : रुद्र चिले (दहावी)

– तृतीय : विश्वा रा. रावल (बारावी)

– उत्तेजनार्थ : आर्या कमलेश आंबेकर (दहावी)


Share

3 thoughts on “एका मुलाच्या कलेतून दुसऱ्या मुलाच्या शिक्षणाला आधार!”

  1. असे कार्यक्रम करण्यास खुप मेहनत करावी लागतें देवा यांच्या मेहनतीला भरभरुन यश लाभू दे आपले खुप खुप अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *