बोरिवलीत मुलींचे मोफत स्वसंरक्षण शिबिर उत्साहात संपन्न

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे

‘आम्ही किशोरी घेऊ भरारी’ उपक्रमाला प्रतिसाद; ८० मुलींनी घेतले कुंगफूचे प्रशिक्षण.

मालाड, ता. १६ (बातमीदार) : मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासह स्वसंरक्षणाचे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने जनसंवाद संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेले सात दिवसीय मोफत स्वसंरक्षण (कुंगफू) प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. ‘आम्ही किशोरी घेऊ भरारी’ या उपक्रमांतर्गत ९ ते १५ नोव्हेंबरदरम्यान बोरिवली पूर्व येथील गोल्डन क्रीडा मैदानावर हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ८० मुलींनी सहभाग नोंदविला.

१५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिबिराचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले. यावेळी सहभागी मुलींनी गायनासह विविध कलागुणांचे सादरीकरण केले. तसेच सात दिवसांच्या प्रशिक्षणादरम्यान शिकलेल्या स्वसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

या समारोप सोहळ्याला पोलीस उपनिरीक्षक राजश्री पटाले, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रगती राणे लोकरे, काँग्रेस पदाधिकारी मनोज नायर, विजय नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी मुलींच्या सहभागाचे आणि त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आपल्या मनोगतातून स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

सेलवन तामिळ, तेजस शुक्ला, ओंकार आणि संजर शिंदे यांनी सात दिवस मुलींना कुंगफू व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. जनसंवाद संस्थेच्या वतीने हे संपूर्ण प्रशिक्षण विनामूल्य आयोजित करण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी आभार मानले.


Share

3 thoughts on “बोरिवलीत मुलींचे मोफत स्वसंरक्षण शिबिर उत्साहात संपन्न”

  1. आम्ही किशोरी घेऊ भरारी’ आयोजित शिबिरास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आभार व्यक्त करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *