एसआयआर’विरोधात ३० सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेविरोधात ‘एसआयआर’ जागृती अभियान, महाराष्ट्र’च्या ऑनलाइन बैठकीत विविध सामाजिक संघटना तसेच महाविकास आघाडीशी संबंधित प्रतिनिधी सहभागी झाले. बैठकीत सखोल चर्चा झाल्यानंतर विविध मागण्या व आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
बैठकीत सहभागी प्रतिनिधींनी आरोप केला की, SIRचा उद्देश केवळ मतदार यादी शुद्ध करणे नसून भाजपच्या हातात सत्तेचे केंद्रीकरण कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांचे मत आहे. मतदारांनी आपल्या प्रतिनिधींची निवड करण्याऐवजी आता राजकीय सोयीप्रमाणे मतदारांची निवड केली जात असल्याचा आरोपही करण्यात आला. या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसमधील अलीकडील वृत्ताचा दाखला बैठकीत देण्यात आला.

लोकशाहीमध्ये पात्र मतदाराला मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवणे गंभीर बाब असल्याचे सांगत, निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवरही बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाई करून त्यांना पदावरून तत्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली.एसआयआर प्रक्रिया तातडीने स्थगित करून पूर्वीच्या पद्धतीनुसार मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच या मागण्यांसाठी सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले.
३० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील आझाद मैदानात जनसंघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांची निषेध सभा घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याच दिवशी तालुका व जिल्हास्तरावरही सोयीच्या वेळेनुसार निषेध सभा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या ऑनलाइन बैठकीला जन आंदोलन संघर्ष समिती, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद, भारत जोडो अभियान, शोषित जन आंदोलन, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, संयुक्त किसान मोर्चा, पी.यू.सी.एल., नारी अत्याचार विरोधी मंच, जन सुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती आणि द बॉम्बे कॅथोलिक सभा आदी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *