
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सलीम सारंग यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वरिष्ठ नेत्यांवर सार्वजनिकपणे टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने आपली राजकीय पात्रता, अनुभव आणि पक्षासाठीचे योगदान तपासावे, असा टोला सारंग यांनी लगावला.
“हे सामूहिक अपयश नाही, हे तुमचंच अपयश आहे,” असे वक्तव्य ठोंबरे पाटील यांनी तटकरे यांच्याबाबत केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सारंग म्हणाले की, पक्षातील मतभेद असतील तर ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडले पाहिजेत. अंतर्गत बाबी माध्यमांसमोर मांडून पक्षाची प्रतिमा आणि संघटना कमकुवत करणे योग्य नाही.
सुनील तटकरे यांना प्रदीर्घ राजकीय अनुभव असून, त्यांच्या नेतृत्वावर सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी प्रत्येकाने शब्दांचे भान ठेवले पाहिजे. केवळ वरिष्ठ नेत्यांवर टीका करून किंवा माध्यमांत प्रसिद्धी मिळवून कोणी मोठा नेता होत नाही, असेही सारंग यांनी स्पष्ट केले.
प्रसिद्धीसाठी वरिष्ठ नेत्यांवर टीका करणाऱ्यांना उद्देशून सारंग म्हणाले, “काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही; शेवटी कावळाच म्हणून ओळखला जातो.” पक्षाच्या शिस्तीचा आणि एकजुटीचा विचार करून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत सारंग म्हणाले की, त्यांनी विविध विचारांच्या लोकांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढवली. मात्र आता बाहेरील विरोधकांपेक्षा पक्षातीलच काही व्यक्ती एकमेकांविरोधात वक्तव्ये करत असल्याचे चित्र दिसत आहे. ही बाब पक्षाच्या भविष्यासाठी चिंताजनक आहे.
सुनील तटकरे, सुनेत्रावहिनी पवार आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगला समन्वय असून पक्षहिताचे निर्णय सामूहिकपणे घेतले जात आहेत. त्यामुळे गैरसमज निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना बळी न पडता सर्वांनी एकत्र येऊन पक्षाची संघटना मजबूत करावी, असे आवाहन सलीम सारंग यांनी केले.
अजित पवार राष्ट्रवादित सर्व अलबेल???