

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.
मुंबई :मुंबईतील १४ वर्षीय चिमुरडी देवात्मिका परब सध्या आयुष्याच्या अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. मागील दीड महिन्यांपासून सतत डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्याने तिला मुंबईतील नानावती मॅक्स सुपर स्पेसिऍलिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
तपासणीनंतर देवात्मिकाच्या मेंदूमध्ये गंभीर गाठ असल्याचे निदान झाले असून, या गाठीमुळे मेंदूवर प्रचंड दाब निर्माण झाला आहे. त्यामुळे तिच्या शरीराच्या डाव्या भागाची हालचाल मंदावली आहे.
देवात्मिकावर आतापर्यंत दोन वेळा अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ४ मे रोजी पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर मेंदूला आलेली सूज वाढल्याने ९ मे रोजी पुन्हा आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या ती पीआयसीयू (PICU) मध्ये व्हेंटिलेटरवर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या वैद्यकीय लढाईमुळे कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. देवात्मिकाच्या उपचारांसाठी आतापर्यंत सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च झाला असून, पुढील उपचारांसाठी आणखी १५ लाख रुपयांची गरज आहे. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा खर्च पेलणे अत्यंत कठीण झाले असून, आता सर्व आशा समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या मदतीवर टिकून आहेत.
देवात्मिकाच्या उपचारांसाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्तींनी तिचे वडील राघो परब यांच्याशी 77387 57582 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Ohhverysad