वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवा, स्त्रियांचे शोषण थांबवा :प्रा. श्याम मानव

Share

एस एमएस -उत्कर्ष बोरले.

मुंबई :मंगळवार दिनांक १२ मे रोजी दादर येथील राजर्षी शाहू महाराज सभागृहात प्रा. श्याम मानव यांचे “बुवा तेथे बाया” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. समाजातील अंधश्रद्धा, भोंदू बाबांचे वाढते प्रस्थ आणि त्यातून होणारे विशेषतः महिलांचे शोषण यावर त्यांनी परखड भाष्य केले.

प्रा. श्याम मानव यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, कोणत्याही व्यक्तीकडे अलौकिक अथवा अद्भुत शक्ती नसते. जे स्वतःकडे अशा शक्ती असल्याचा दावा करतात, ते भोंदू असतात. शेकडो बाबांचा भांडाफोड केल्यानंतर “कोणताही बाबा स्त्रियांच्या सहवासापासून दूर राहू शकत नाही,” हे वास्तव समाजासमोर आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बालपणापासून समाजात रुजलेल्या चुकीच्या समजुतींमुळे लोकांची फसवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “गुरुला तन-मन-धन अर्पण करावे” या संस्कारांमुळे अनेक स्त्रिया बुवांच्या जाळ्यात अडकतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्यामुळे बाबा-बुवांचे प्रत्येक शब्द प्रमाण मानले जातात आणि त्यातून आर्थिक, मानसिक तसेच शारीरिक शोषण घडते, असे त्यांनी सांगितले.

या समस्येवर एकमेव उपाय म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाला माजी वरिष्ठ पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर प्रमुख उपस्थित होते. “कोणत्याही माणसाचा जन्म पायातून होत नाही, हे विज्ञान मान्य करत नाही,” असे ठाम विधान त्यांनी केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मधुकर कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समितीचे उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर यांनी विविध क्षेत्रांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांनी महाराष्ट्रभर सुरू असलेल्या प्रबोधन अभियानाचा आढावा घेत प्रत्येक जिल्ह्यात अशा सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी वरिष्ठ पत्रकार विकास झाडे, समितीचे सचिव प्रशांत सपाटे आदी मान्यवर उपस्थित होते. नीता डुबे यांनी सूत्रसंचालन केले तर अजित पाध्ये यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जगन्नाथ साबळे, संदीप पवार, ज्ञानेश मावळे, प्रकाश ढोकणे, कल्पना गोसावी, सुधीर सरोज, कैलास मोहिते, किरण जाधव, सुरेन सुनंदा, सचिन हिंदळेकर, वामन गार्डे तसेच मुंबई संघटक चंद्रकांत सर्वगोड यांनी विशेष परिश्रम घेतले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *