
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे
मुंबई : भाकर फाउंडेशन आयोजित ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ अंतर्गत आज बालसभेतील सदस्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी/दक्षिण प्रभाग समिती कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली.
यावेळी प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीकला पिल्ले, नगरसेविका प्रीती साटम, नगरसेवक हर्ष पटेल आणि विक्रम राजपूत उपस्थित होते.
सुरुवातीला समाजवादी नेते अरविंद सावला सर यांनी बालसभेतील सदस्यांचे स्वागत केले.
प्रभाग समितीच्या बैठकीत बालसभेतील सदस्यांनी अध्यक्ष आणि नगरसेवकांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील विविध समस्या मांडत बालकांच्या समस्या, नागरी सुविधा आणि बाल हक्कांसंदर्भात अनेक प्रश्न विचारले. लोकप्रतिनिधींशी झालेल्या या संवादातून बालकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली.
याप्रसंगी राहुल म्हात्रे, कनिष्ठ अभियंता (मेंटेनन्स विभाग) यांनी बालकांना पी/दक्षिण विभागातील विविध प्रशासकीय विभागांची ओळख करून दिली. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, मेंटेनन्स, आरोग्य, शिक्षण, मलेरिया, नागरी दारिद्र्य निर्मूलन, उद्यान आणि आपत्कालीन इतर विभागांच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. तसेच प्रभाग समितीची कार्यपद्धती आणि सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शैक्षणिक भेटीमुळे बालकांना महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज, नागरी सुविधा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका प्रत्यक्ष समजून घेता आली. बालकांचा शहराच्या प्रशासनातील सहभाग वाढवणे आणि बालस्नेही प्रभाग निर्मितीसाठी त्यांना सक्षम करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
Good initiative