एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
२४ तास नियंत्रण कक्ष, बहुभाषिक तक्रार सुविधा आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी
मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, अनधिकृत पार्किंग आणि वाहतुकीच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी वाहतूक पोलीस विभागाकरिता स्वतंत्र तीन अंकी टोल-फ्री हेल्पलाईन व नियंत्रण क्रमांक सुरू करण्यात यावा, अशी मागणी मुंबई विभागीय काँग्रेस समितीचे महासचिव संतोष चिकणे यांनी आमदार असलम शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई शहरासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणेतील बिघाड, बेशिस्त वाहनचालक, चुकीच्या पद्धतीने होणारे पार्किंग आणि अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्यांची माहिती तातडीने संबंधित वाहतूक पोलिसांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन असणे आवश्यक असल्याचे चिकणे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र तीन अंकी क्रमांक सुरू करून ही सेवा २४ तास उपलब्ध करून द्यावी. तसेच मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय प्राप्त तक्रारींची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी आणि कार्यवाहीची माहिती नागरिकांना एसएमएस किंवा अन्य माध्यमातून द्यावी. या हेल्पलाईनची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीच्या माध्यमातून पोहोचवावी, असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे.
या सुविधेमुळे वाहतूकविषयक तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यास मदत होईल. तसेच अपघात रोखणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि नागरिकांना वेळेत मदत मिळवून देणे शक्य होईल. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्यभरात वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र तीन अंकी हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती संतोष चिकणे यांनी केली आहे.