
गणेश विसर्जनाच्या मार्गावर दुर्घटनेची भीती; नागरिकांकडून तातडीने दुरुस्तीची मागणी
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मालाड, ता. १७ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी क्रमांक ३ येथील बेकरीलगतच्या गटाराची भिंत खचल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. बुधवारी (ता. १६) किराणा सामान घेऊन घरी परतणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेचा गटाराची भिंत अचानक कोसळल्याने तोल जाऊन पडल्या. त्यांच्या हातातील किराणा सामानही खाली पडले. सुदैवाने या वेळी तेथून जाणाऱ्या मनोज त्रिपाठी यांनी धाव घेत ज्येष्ठ महिलेला सावरल्याने मोठी दुर्घटना टळली.
या गटाराची मागील १५ वर्षांपासून दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे गटारावरील ढापे तुटले असून, चिंचोळ्या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना गटारात पडण्याची भीती आहे.
सध्या गणेशोत्सव सुरू असून, या परिसरातील सुमारे अडीच हजार लोकवस्तीतील २० ते २५ घरांमध्ये पाच व दहा दिवसीय घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी भाविकांना याच चिंचोळ्या रस्त्यावरून जावे लागणार आहे. पर्यायी मार्ग नसल्याने विसर्जनावेळी गटारात पडून दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पालिकेने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून गटाराची भिंत व तुटलेले ढापे तातडीने दुरुस्त करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
Bmc??