
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे पादचारी आणि प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास; तातडीने गटार सफाईची मागणी.
मुंबई : मालाड पश्चिमेतील अत्यंत महत्त्वाच्या साईनाथ रोडवर गेल्या वर्षभरापासून गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत साईनाथ मंडई असून, मालाड रेल्वे स्थानकात ये-जा करणारे प्रवासी, ग्राहक आणि वाहनचालक मोठ्या प्रमाणात या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सतत तुंबणाऱ्या गटारांमुळे या वर्दळीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
या परिसरात बेस्ट बस थांबा, रिक्षा स्टँड आणि शेअर टॅक्सी स्टँड असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर साचल्याने पादचाऱ्यांना त्यातूनच मार्ग काढावा लागतो. अनेकदा दुचाकी आणि इतर वाहनांमुळे हे घाण पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर व कपड्यांवर उडते. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीसह अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येबाबत विविध संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पी-पश्चिम विभागाकडे तसेच ऑनलाइन तक्रारी केल्या आहेत. मात्र, अद्याप गटारांची नियमित सफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी केला आहे.
पालिकेने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गटारांची साफसफाई करावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि परिसरात औषध फवारणी करावी, अशी मागणी पादचारी, वाहनचालक, दुकानदार आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पालिका ज्या दिवशी मना पासून काम करेल त्या दिवशी जनतेची खरी दिपावली
Bmc pwest?
कायहे तुम्ही येथूनच चलतपी पश्चिम वार्ड कार्यालयात जाता ना??