रेल्वे पादचारी पुलाची दुरवस्था.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिम आणि पूर्व भागाला जोडणाऱ्या रेल्वे पादचारी पुलाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, पुलावर ठिकठिकाणी कचरा साचल्याने प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कांदिवलीच्या दिशेला असलेल्या या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जिन्यांची मागील अनेक दिवसांपासून साफसफाई झालेली नसल्याचा आरोप पादचाऱ्यांनी केला आहे.

‘स्वच्छ रेल, स्वच्छ परिसर’ असा संदेश देणाऱ्या रेल्वे प्रशासनालाच मालाडच्या या पादचारी पुलाची अस्वच्छता दिसत नाही का, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पुलावर कचरा साचल्याने दुर्गंधी निर्माण झाली असून, अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

पुलाच्या परिसरात भटके श्वान आणि मांजरे आश्रय घेत असल्याचे चित्र दिसत असून, पादचारी या पुलाचा वापर करण्यास टाळाटाळ करत असल्याने त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंता निर्माण झाली आहे. त्यातच गुटखा आणि पान खाऊन पुलाच्या जिन्यांवर सर्रास थुंकण्यात आल्याने संपूर्ण जिना थुंकीच्या लाल डागांनी रंगलेला दिसत आहे.

दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या मालाड रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलाची अशी अवस्था असेल, तर रेल्वे प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेचे नेमके फलित काय? असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी निधी आणि यंत्रणा उपलब्ध असतानाही प्रत्यक्षात पुलाची नियमित साफसफाई होत नसेल, तर संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पादचारी पुलाची संपूर्ण स्वच्छता करावी, जिन्यांची नियमित साफसफाई करावी तसेच भटक्या प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *