एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : नेहरूनगर येथील केदारनाथ इंग्लिश शाळेतील कायम शिक्षिका गुड्डीदेवी गुप्ता यांना सेवेत हजर करून घेतले जात नसल्याचा आरोप आहे. न्यायाच्या मागणीसाठी त्या दोन वर्षांच्या मुलीसह १० सप्टेंबर पासून शाळेसमोर व शिक्षण विभागासमोर उपोषण करणार आहेत. शिक्षक लोकशाही आघाडी मुंबईने त्यांना पाठिंबा दिला आहे.
गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, मुलीची प्रकृती आणि पतीकडून होणाऱ्या कथित मानसिक त्रासामुळे त्या २०२५मध्ये काही महिने शाळेत जाऊ शकल्या नाहीत. शाळेने जून २०२६पासून हजर राहण्यास सांगितले; मात्र प्रत्यक्षात सेवेत घेतले नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी हजर करून घेण्याचे आदेश दिले, तरी संस्थेने ते पाळले नसल्याचा आरोप आहे.
१५ ऑगस्टला कागदपत्रे व वैद्यकीय अहवालांसह शाळेत उपस्थित राहूनही त्यांना हजर करून घेतले नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले. “सेवेत रुजू करून न्याय द्यावा,” अशी त्यांची मागणी आहे. टिडीएफ मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.