एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई : बेस्ट वर्कर्स युनियनचे धडाडीचे कार्यकर्ते, नारायण फेणाणी यांचे विश्वासू सहकारी आणि नागरी निवारा परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते यशवंत खंडेराव (वय ८८) यांचे आज, ९ सप्टेंबर रोजी सकाळी आकस्मिक निधन झाले.नागरी निवारा परिषदेच्या कठीण काळात त्यांनी संघटनेची बाजू निर्भीडपणे आणि भक्कमपणे मांडली. प्रचंड निष्ठावान व विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. नागरी निवारा परिषदेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ते नेहमी आस्थेने विचारपूस करीत. सदैव हसतमुख असलेले खंडेराव हे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आपुलकीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते.त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गोरेगाव नागरी निवारा परिषद परिसरात शोककळा पसरली.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून असं भला मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी आज दुपारी १२ वाजता नागरी निवारा परिषद वसाहत, गोरेगाव पूर्व येथील त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी शेकडो नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित राहून खंडेराव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.