एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी.
मुंबई :मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ पद्धतीने मिळणार आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२३ पासून पात्र लाभार्थींना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.
नवीन प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो-फेच केली जाणार असून, लाभार्थी, माता आणि पिता यांचे ई-केवायसी करण्यात येणार आहे. त्यामुळे वारंवार कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही. पुढील टप्प्यांतील लाभांसाठीही पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही.
लाभाची रक्कम संलग्न बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केली जाणार असल्याने स्वतंत्रपणे बँक खात्याची माहिती देण्याची गरज भासणार नाही. तसेच अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही लाभार्थ्यांना भरावी लागणार नाही.
मुलींना मिळणार ₹१ लाख १ हजारांचा लाभ
लेक लाडकी योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलींना टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत दिली जाते.
जन्मानंतर – ₹५,०००
इयत्ता पहिलीत प्रवेश – ₹६,०००
इयत्ता सहावीत प्रवेश – ₹७,०००
इयत्ता अकरावीत प्रवेश – ₹८,०००
मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर – ₹७५,०००
अशा प्रकारे एकूण ₹१,०१,००० रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे तसेच शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न व इतर पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, प्रक्रियेतील या सुलभीकरणामुळे अर्ज प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि लाभार्थी-केंद्रित होऊन जास्तीत जास्त पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल.