
एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक
मुंबई :रयत शिक्षण संस्थेच्या कांदिवली सह्याद्री नगर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे.
या परीक्षेसाठी विद्यालयातील १७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. विद्यालयाचा निकाल ७६.४७ टक्के लागला आहे.
मनस्वी संतोष पडवळ हिने १२६ गुण मिळवत मुंबई पश्चिम जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच कस्तुरी अज्ञान गोसावी हिने ७५ गुणांसह एनटीबी प्रवर्गातून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
शिष्यवृत्ती पात्र प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता ९ वी ते १२ वी या चार वर्षांसाठी दरवर्षी १२ हजार रुपये, असे एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये प्रांजल सणस, रिया कदम, शब्दवी जगताप, प्रथमेश कारभारी, वरदराज कदम, सोहम गाडे, प्रत्युषा पवार, श्रावणी डुबल आणि अथर्व रक्ताडे यांचा समावेश आहे.
अवघ्या एका गुणाने शिष्यवृत्तीपासून वंचित राहिलेली ईश्वरी बांदल तसेच तीन गुणांनी अपयशी ठरलेला शिवम खवरे यांच्या प्रयत्नांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रशांतदादा पाटील, संगीता पाटील, स्कूल कमिटी सदस्य मदनराव चव्हाण, विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे, सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप, मुख्याध्यापिका शिल्पा जरे तसेच प्राथमिक विभागाचे प्रभारी मुख्याध्यापक उमाकांत जगताप यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.
या यशामुळे विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून सर्वच थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.