
एस एम एस – प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.
मुंबई :मालाड रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन मार्च २०२५ मध्ये नवीन लोखंडी प्लॅटफॉर्म उभारण्यात आला होता. मात्र वर्ष उलटूनही या प्लॅटफॉर्मवर अद्याप छत बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे मालाडहून विरारकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
सध्या वाढत्या तापमानामुळे प्रवाशांना कडक उन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. डोक्यावर छत नसल्याने वरून उन्हाचा तडाखा बसतो, तर खाली लोखंडी प्लॅटफॉर्म असल्याने उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे.
रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांनी ग्रस्त प्रवाशांना उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने तात्पुरते तरी छत उभारून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
Very bad