
एसएमएस-प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
मुंबई :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी पुकारलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठाकरे समर्थक शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करून बैठकीला गैरहजर राहिलेल्या बंडखोर खासदारांविरोधात विविध शहरांमध्ये निषेध आंदोलन करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून ईशान्य मुंबईतील घाटकोपर येथे गुरुवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आक्रोश आंदोलन करण्यात आले.
घाटकोपर पश्चिम येथील रिद्धी-सिद्धी गणेश मंदिर परिसरातील भटवाडी येथे झालेल्या या आंदोलनात शिवसैनिकांनी बंडखोर खासदारांविरोधात काळे झेंडे दाखवत तीव्र निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. “चले जाव… चले जाव… संजय पाटील चले जाव…” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी घाटकोपर विधानसभा समन्वयक इम्रान शेख, विधानसभा प्रमुख सुभाष पवार, उपविभाग प्रमुख विलास पवार, शाखाप्रमुख संजय कदम, अजय भोसले तसेच महाविकास आघाडीचे शरद कदम यांच्यासह महिला-पुरुष शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी जनतेने लोकशाही प्रक्रियेतून निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पक्षशिस्त आणि मतदारांच्या विश्वासाचा सन्मान राखला पाहिजे, असे मत व्यक्त केले. जनादेशाशी प्रतारणा करणाऱ्या कृतींना शिवसैनिक कधीही समर्थन देणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शांततापूर्ण वातावरणात पार पडलेल्या या आंदोलनात बंडखोर खासदारांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. आगामी काळात जनादेशाच्या संरक्षणासाठी आणि पक्षनिष्ठा कायम ठेवण्यासाठी अशाच प्रकारची आंदोलने सुरू ठेवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केला.
Great
मतदरांनीयांनाहकलुन लावावे जेने करूँ है मतचोर पुन्हाअस कार्य करण्याची हिम्मत करनर नाही तरी मत तर लोकक देतात ना?कि पक्ष1?