दृष्टीहीन महिला व दिव्यांगांनी तयार केल्या छत्र्या..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.

मुंबई : महापालिकेच्या ‘बी’ विभागातील प्रथमदर्शी प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी छत्री प्रदर्शनाला पालिका कर्मचारी आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्रायजेस या संस्थेच्या माध्यमातून दृष्टीहीन महिला आणि अन्य दिव्यांगांनी स्वहस्ते तयार केलेल्या आकर्षक छत्र्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त केले.

बी विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या आणि कौशल्य प्रशिक्षणासह उपजीविका केंद्र चालवून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्षा मीनल संजय तुर्डे यांच्या संकल्पनेतून हा प्रदर्शन व विक्री उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल संस्थेचे महासचिव राधाकृष्ण नायर तसेच दिव्यांग विक्रेत्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

संस्थेमार्फत दृष्टीहीन महिला आणि इतर दिव्यांग व्यक्तींनी तयार केलेल्या ‘नेत्रा’ ब्रँडच्या छत्र्यांची गुणवत्ता उत्कृष्ट असून, या छत्र्यांची खरेदी केल्यास दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हातभार लागेल, तसेच गरजू आणि बेरोजगार दिव्यांगांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असे मत सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी व्यक्त केले. त्यांनी दिव्यांग बांधवांना उत्तम विक्रीसाठी शुभेच्छाही दिल्या.

यावेळी स्थानिक नगरसेविका रुखसाना पारेख, समाज विकास अधिकारी मनोजकुमार शितूत, समुदाय संघटक रेश्मा हरेकर तसेच मूकबधिर विक्रेते कृष्णा गोवडा उपस्थित होते.


Share

2 thoughts on “दृष्टीहीन महिला व दिव्यांगांनी तयार केल्या छत्र्या..

  1. हा देवान दिलेला वरदान आहे लोकने छत्र्यांची खरेदी केल्यास दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हातभार लागेल, तसेच गरजू आणि बेरोजगार दिव्यांगांसाठी अधिक रोजगाराच्या संधी लाभेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *