एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान केल्याच्या आरोपावरून धीरेंद्र शास्त्री आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या मंगळवारी (दि. २८ एप्रिल) दादर येथील शिवाजी पार्क येथे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस, महाविकास आघाडी, डावे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने सायंकाळी ४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली जाणार आहेत.
आमदार संजय गायकवाड यांनी “शिवाजी कोण होता?” या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच धीरेंद्र शास्त्री यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अद्याप कठोर कारवाई झालेली नसल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असून, पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही राजहंस यांनी सांगितले.
Great जय छत्रपती शिवजी महाराज