
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मालाड-मार्वे रोडवरील गेट क्रमांक १ येथे बसविण्यात आलेले दुभाजक तुटून पडल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पालिका निवडणुकीपूर्वी घाईगडबडीत बसविण्यात आलेले हे दुभाजक आता हळूहळू तुटू लागल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मार्वे रोडवरून मालाडच्या दिशेने येणारी वाहने वेगात धावत असतात. विशेषतः खारोडी परिसर उंच भागात असल्याने येथून उतारावरून येणाऱ्या वाहनांचा वेग अधिक असतो. अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेले मोठे दुभाजक वाहनांना अचानक धडक देऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, तुटलेले दुभाजक हे वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असून त्यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने या दुभाजकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, दुभाजकांच्या दुर्लक्षामुळे अपघात घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी पालिका प्रशासनाने घ्यावी, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.