
एसएमएस. प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
मुंबई, ता. १३ (प्रतिनिधी) : सत्ताधारी आणि प्रशासनाकडून मुंबईतील नालेसफाई शंभर टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी मुंबई आणि उपनगरांतील अनेक नाल्यांमधील गाळ अद्याप काढण्यात आलेला नसल्याचा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) केला आहे. मुंबईची तुंबई होऊ द्यायची नसेल, तर तातडीने प्रभावी नालेसफाई करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केली.
पावसाळा तोंडावर आला असतानाही नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा फोल ठरविणारे छायाचित्रे आणि फलक प्रदर्शित करून किल्लेदार यांनी शनिवारी प्रशासनाची पोलखोल केली. मुंबई उपनगरातील वडाळा, धारावी, भारतनगर, नाहूर, गोवंडी, कुर्ला, पंचशील नगर, अशोक नगर, क्रांतीनगर, वाकोला, मानखुर्द, चेंबूर तसेच केशवपाडा नाल्यासह विविध भागांतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
“सत्ताधारी नाल्यांच्या पाहणीसाठी येण्यापूर्वी पालिका अधिकारी ठेकेदारांना सूचना देतात. त्यानंतर यंत्रसामग्री लावून तात्पुरती साफसफाई करण्यात आल्याचे दाखवले जाते. आम्ही सातत्याने या प्रश्नावर आवाज उठवत असलो, तरी पालिकेच्या सभागृहात आम्हाला बोलू दिले जात नाही,” असा आरोपही किल्लेदार यांनी केला.
भाजपचे सहकारीच महापौरांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप करत त्यांनी पावसाला झालेला विलंब ही मोठी संधी असून, त्याचा फायदा घेत तातडीने नालेसफाई पूर्ण करावी, अशी मागणी केली.
याशिवाय मुंबईत निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे पालिकेने १० टक्के पाणी कपात केली असली, तरी पाण्याचा दाब कमी केल्याने अनेक भागांत नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पाणी प्रकल्पांवर मोठा खर्च होत असताना जुन्या व जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने त्या बदलण्याची तसेच पाणी चोरी रोखण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईतील सुमारे ७० टक्के रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले असल्याचा दावा केला जात असताना, सभागृहात खड्डे भरण्यासाठी प्रस्ताव मांडला जात असल्याबद्दलही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “रस्ते झाले असतील, तर खड्डे भरण्याचा प्रस्ताव कशासाठी?” असा सवालही किल्लेदार यांनी उपस्थित केला.