मच्छिमार महिलेला ३.५० लाखांची नुकसानभरपाई..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

मुंबई : मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी सोसायटी लिमिटेडच्या महिला सभासद सौ. प्रविणा संतोष कोळी यांना त्यांच्या ‘भिमाशंकर’ नौकेच्या डोळ मासेमारी (बॅग नेट) जाळ्यांचे नुकसान झाल्याप्रकरणी तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई प्राप्त झाली. मार्च २०२६ मध्ये शिपिंग इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मालवाहू जहाजामुळे जाळ्यांचे नुकसान झाले होते.
या घटनेनंतर मढ दर्यादीप मच्छिमार सहकारी संस्थेने राज्य मत्स्यव्यवसाय विभाग तसेच मर्कंटाईल मरीन विभाग, मुंबई यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला. अखेर शिपिंग इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकडून नुकसानभरपाई मिळविण्यात यश आले.
शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय मुंबई उपनगर सौ. ऐश्वर्या रणदिवे यांच्या हस्ते लाभार्थी सौ. प्रविणा संतोष कोळी यांना धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ मच्छिमार नेते व संस्थापक किरण कोळी, मुंबई मत्स्य विकास अधिकारी सौ. पूजा साळवी, परवाना अधिकारी बाळाजी पवार तसेच सागर मित्र बिपिन भालेराव उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष रविंद्र कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष शेखर धाके, सचिव स्वप्निल कोळी, खजिनदार हरेश कोळी यांच्यासह संचालक मंडळ, सल्लागार, महिला पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले.


Share

One thought on “मच्छिमार महिलेला ३.५० लाखांची नुकसानभरपाई..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *