एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी.
मुंबई, दि. ३ जून : राज्यातील प्रतिबंधित पानमसाला, गुटखा तसेच भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राबविलेल्या राज्यव्यापी विशेष मोहिमेत २५ मे ते ३१ मे २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत १ कोटी ५८ लाख २८ हजार ६७७ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान १०२ जणांना अटक करण्यात आली असून, एकूण २०३ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ८६ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत १३० ठिकाणी छापे टाकण्यात आले.
या कारवाईत कोकण विभागात ४७ कारवाया करून ४६ जणांना अटक करण्यात आली, तर बृहन्मुंबईत २२ कारवायांमध्ये २३ जणांना अटक करण्यात आली. पुणे विभागात १४, नाशिकमध्ये ५, छत्रपती संभाजीनगरमध्ये ८, अमरावतीमध्ये ५ आणि नागपूर विभागात २ कारवाया करण्यात आल्या. या मोहिमेत एकूण ३४ लाख ५ हजार ४८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम २६, २७, ३०(२)(अ) आणि ५९ अंतर्गत संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत भेसळयुक्त व निकृष्ट अन्नपदार्थांवरही मोठी कारवाई करण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, भंडारा, जालना, बीड, नांदेड, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम, जळगाव, रायगड आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी विशेष तपासण्या केल्या.
या मोहिमेत ७३ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आंबे, बुंदी लाडू, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, दूध व दुग्धजन्य पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रोजन डेझर्ट, मसाले, शेंगदाणा चिक्की आदी पदार्थांचा समावेश होता. या कारवाईत १ कोटी २४ लाख २३ हजार ६२९ रुपये किमतीचा आणि सुमारे ९० हजार ६३९ किलो वजनाचा संशयित निकृष्ट व असुरक्षित अन्नसाठा जप्त करण्यात आला. संबंधित नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
नागरिकांना शुद्ध व सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित पदार्थांच्या उत्पादन व विक्रीविरोधात यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी अॅप विकसित करण्यात आले असून, १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा jc-foodhq@gov.in या ई-मेलवर तक्रार करता येणार आहे. तक्रार करताना नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता आणि भेसळीबाबतची माहिती नमूद करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Goodaction