
सिरत सातपुते
13 नोव्हेंबर 2026
12 नोव्हेंबर रोजी अलिबाग जवळील चौल-बेलाई येथे नारायण नाईक प्रतिष्ठान आणि उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठांचा सन्मान आणि समाजभान कार्यकर्तृत्व पुरस्कार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली. नारायण नाईक प्रतिष्ठानचे विश्वस्त, नायब तहसीलदार प्रभाकर नाईक उर्फ तात्या नाईक यांच्या निमंत्रणावरून मी या कार्यक्रमाला गेले होते. सामाजिक कार्याच्या क्षेत्रात काम करताना तात्यांशी निर्माण झालेला सहभाव आणि त्यांच्याशी असलेले आपुलकीचे नाते यामुळे या निमंत्रणाला माझ्यासाठी विशेष अर्थ होता. कै. नारायण (भाऊ) नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित हा सोहळा अनेक अर्थांनी मनाला भावला.
नारायण नाईक म्हणजे आपल्या गावाशी आणि माणसांशी जोडलेले एक आयुष्य. शेती करत असतानाच गावाच्या सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग, ग्रामपंचायतीतील पंचवीस वर्षांचे योगदान, गावात शाळा आणि अंगणवाडी सुरू व्हावी यासाठी केलेले प्रयत्न, ज्येष्ठ नागरिक संघ आणि सहकारी संस्थांमधील सहभाग अशा अनेक गोष्टींतून भाऊंनी आपली सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवतानाच त्यांनी जपलेली माणुसकी आणि समाजासाठी काम करण्याची वृत्ती पुढे नेण्याचा प्रयत्न त्यांचे कुटुंबीय नारायण नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून करत आहेत.
भाऊंनी आपल्या आयुष्यात गावासाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी जे केले, त्यातून एक गोष्ट लक्षात येते, बदलाची सुरुवात आपल्या आजूबाजूच्या माणसांपासून होते. आपल्या क्षमतेनुसार, आपल्या क्षेत्रात आणि आपल्या परिसरात आपण काहीतरी विधायक काम केले, तरी समाज बदलण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग नक्कीच असू शकतो. एखाद्या माणसाचे आयुष्य संपते, पण त्याने निर्माण केलेली मूल्ये संपत नाहीत. त्याने जोडलेली माणसे, समाजासाठी केलेले काम आणि इतरांच्या आयुष्यात घडवलेला सकारात्मक बदल यांतून तो माणूस जिवंत राहतो. नारायण नाईक यांच्या स्मृती जपण्याचा आणि त्यांचा सामाजिक वारसा पुढे नेण्याचा नाईक कुटुंबीयांचा हा प्रयत्न म्हणूनच कौतुकास्पद आहे.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या पाच मान्यवरांचा गौरव करण्यात आला. अलिबाग येथील निवृत्त प्राध्यापक आणि लेखक शाम जोगळेकर यांना जीवनगौरव पुरस्कार, चौलचे शेतकरी रवींद्र गजानन पाटील यांना कृषिमित्र पुरस्कार, पाली येथील पत्रकार अमित आप्पा गवळे यांना लोकहितकारी पत्रकारिता पुरस्कार, नागाव येथील माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पर्यावरणप्रेमी अतुल हेमंत गुरव यांना वृक्षमित्र राजाभाऊ राईलकर पर्यावरण स्नेही पुरस्कार, तर नांगरवाडी, रामराज येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला बचत गटाच्या समन्वयक प्रमिला शरद गावडे यांना समाजकार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच चौल ज्येष्ठ नागरिक संघातील वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेल्या तीस ज्येष्ठ सदस्यांचाही कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे, सर्व पुरस्कारार्थी अलिबाग आणि परिसरातील आहेत. आपल्या परिसरात चांगले काम करणाऱ्या माणसांना शोधून त्यांचा सन्मान करणे आणि त्यांच्या कार्याची समाजाला ओळख करून देणे ही स्थानिक पातळीवर सकारात्मक परिवर्तनाची प्रक्रिया बळकट करणारी गोष्ट! अशा पुरस्कार सोहळ्यांनी केवळ व्यक्तींचा गौरव करून थांबू नये, तर त्यातून स्थानिक प्रश्नांवर चर्चा व्हावी, तरुणांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी आणि शेतकरी, महिला, पर्यावरण व सामाजिक सलोखा या विषयांवर विधायक संवाद घडावा. प्रतिष्ठानने भविष्यात अशा संवादासाठीही पुढाकार घेतला, तर भाऊंच्या स्मृतींना अधिक व्यापक अर्थ प्राप्त होईल असे मनापासून वाटते.
या सर्वांचा गौरव होत असताना त्यांच्या कामातील एक समान धागा प्रकर्षाने जाणवला. शेती, समाजकार्य, पत्रकारिता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांचे सक्षमीकरण ही क्षेत्रे वेगवेगळी असली, तरी या सर्वांचे काम माणसांच्या जगण्याशी आणि समाजाच्या भवितव्याशी जोडलेले आहे. अनेकदा प्रसिद्धी किंवा मोठ्या व्यासपीठांपासून दूर राहून ही माणसे आपापल्या परीने काम करत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि ते समाजापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. कारण समाजात चांगले काम करणाऱ्या माणसांचा सन्मान करणे म्हणजे समाजाच्या चांगुलपणावरचा विश्वास दृढ करणे होय.
याच संदर्भातून माझ्या मनोगतात शेती आणि पर्यावरणाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. आज शेतकऱ्यांसमोर हवामानातील अनिश्चितता, पाण्याची टंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळणे अशी अनेक आव्हाने आहेत. त्यातच विकासाच्या नावाखाली उभ्या राहणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, जंगलं आणि वृक्षसंपदेचे नुकसान होत आहे. कर्जत आणि सह्याद्री परिसरातील प्रस्तावित प्रकल्प असोत किंवा कोकणातील वाढवण बंदर, जैतापूर आणि बारसूचे प्रश्न असोत, या सगळ्यांकडे केवळ विकासाच्या आकडेवारीतून पाहून चालणार नाही. या प्रकल्पांची किंमत कोण मोजणार, स्थानिक माणसांचे जगणे, शेती, मासेमारी आणि पर्यावरण यांचे काय होणार, हे प्रश्न विचारलेच पाहिजेत. वाढवण बंदराच्या विरोधात बाधित नागरिक समुद्राच्या पाण्यात उभे राहून आंदोलन करत असतानाही त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब आहे. विकासाची खरी कसोटी मोठमोठे प्रकल्प नसून सामान्य माणसाचे जीवन किती सुखकर, सन्मानाचे आणि सुरक्षित झाले, ही आहे.
पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ निसर्गप्रेमींचा किंवा एखाद्या विशिष्ट भागातील लोकांचा प्रश्न नाही. तो आपल्या जगण्याशी आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. त्यामुळे शेतकरी, जागरूक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विशेषतः तरुणांनी शेती, जंगलं आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. आजच्या तरुणाईकडे पाहतानाही हीच व्यापक सामाजिक दृष्टी आवश्यक वाटते. शिक्षणातील अनियमितता, परीक्षांमधील गैरप्रकार, बेरोजगारी आणि संधींची असमानता यांविषयी तरुणांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्या प्रश्नांकडे केवळ नाराजी म्हणून न पाहता लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याची आणि बदल घडवण्याची त्यांची इच्छा म्हणून पाहिले पाहिजे. तरुणांना केवळ भविष्याची आशा म्हणून पाहू नका; वर्तमानाच्या परिवर्तनाचे भागीदार म्हणून पाहिले पाहिजे.
या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपण कोणत्या प्रकारचा समाज घडवू इच्छितो? आज देशासमोर वाढती विषमता, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न, सामाजिक ध्रुवीकरण आणि वाढता द्वेष अशी अनेक आव्हाने आहेत. अशा काळात सामाजिक सलोखा, संवाद आणि सहभावाची जपणूक अधिक महत्त्वाची ठरते. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही संविधानिक मूल्ये केवळ शब्दांपुरती न राहता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झाली पाहिजेत. समाजात तणाव निर्माण करणे सोपे असते; विश्वास निर्माण करायला संयम, संवाद आणि सातत्य लागते. ही जबाबदारी केवळ सामाजिक कार्यकर्त्यांची नसून प्रत्येक जागरूक नागरिकाची आहे.
समाजातील चांगल्या कामांची दखल घेण्याची ही परंपरा अधिक व्यापक होवो. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांवर आधारलेला, माणसामाणसांमध्ये सलोखा जपणारा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांना सन्मान देणारा, निसर्गाशी नाते जपणारा आणि तरुणांच्या स्वप्नांना संधी देणारा समाज घडवण्यासाठी नारायण नाईक प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला आणि पुढील वाटचालीला मनःपूर्वक सदिच्छा!
या कार्यक्रमात अश्विनी मनोज म्हात्रे यांच्या संपादकीय संकल्पनेतून साकारलेल्या ‘काव्यसरी’ दिवाळी विशेषांक २०२६ चे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नारायण नाईक प्रतिष्ठानचे प्रभाकर नाईक, महेंद्र नाईक, मंगेश नाईक, नंदकुमार नाईक, ललिता म्हात्रे, राजश्री नाईक, भक्ती रानवडे आणि संयोजन समितीतील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा
Great