एसएमएस-प्रतिनिधी -दिनेश गोसावी
मुंबई, दि. ६ : जनगणना 2027 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरयादी व घरगणनेतील स्व-गणना प्रक्रियेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्वतः आपल्या कुटुंबासह स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करत एसई (Self Enumeration) पोर्टलवर माहिती नोंदवली. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्य प्रधान जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा जे. डांगे, जनगणना कार्य संचालनालयाचे सहसंचालक संतोष पायस उपस्थित होते. त्यांनी मुख्य सचिवांना स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.
तसेच डॉ. डांगे यांच्या हस्ते गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनाही स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
भारतीय जनगणनेच्या इतिहासात प्रथमच प्रत्येक नागरिकाला स्व-गणनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या प्रक्रियेत नागरिक स्वतःची व कुटुंबाची माहिती अधिकृत वेब पोर्टलद्वारे भरू शकतात. महाराष्ट्रासाठी हे एसई पोर्टल १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे.
हे पोर्टल सुरक्षित आणि सोयीस्कर असल्यामुळे नागरिकांना त्यांच्या वेळेनुसार माहिती भरता येते. जनगणना प्रगणक घरी भेट दिल्यावर स्व-गणनेत भरलेली माहिती पडताळण्यासाठी नागरिकांनी त्यांना एसई आयडी देणे आवश्यक राहणार आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवून मोठ्या प्रमाणावर ‘स्व-गणना’ पर्याय निवडावा, त्यामुळे माहिती अधिक अचूक आणि कार्यक्षम पद्धतीने नोंदवली जाईल, असेही मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी नमूद केले.