एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई : राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगत मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ‘शक्ती’ कायदा तातडीने लागू करावा तसेच राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
गायकवाड यांनी पत्रात नमूद केले की, महाराष्ट्राची कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत असलेली प्रतिमा गेल्या काही वर्षांत ढासळली आहे. महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या राज्यात अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, महिला व लहान मुली सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण, चाकणमधील घटना, बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील अत्याचार तसेच मुंबईतील साकीनाका येथील क्रूर घटना यांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. या घटना केवळ काही शहरांपुरत्या मर्यादित नसून संपूर्ण राज्यभर अशा प्रकारांचे प्रमाण वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचा दावा करत, मुंबईसारख्या महानगरातही महिलांविरोधातील गुन्ह्यांत वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. बलात्कार, विनयभंग व बाल लैंगिक शोषण (POCSO) प्रकरणे वाढत असून, महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महाविकास आघाडी सरकारने सर्वसंमतीने मंजूर केलेला ‘शक्ती’ कायदा अद्याप केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याचे सांगत, या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. या कायद्यात गंभीर गुन्ह्यांसाठी २१ दिवसांत फाशीची तरतूद असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, राज्यात स्वतंत्र गृहमंत्री नसल्याने कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचा आरोप करत, सक्षम व पूर्णवेळ गृहमंत्री नियुक्त करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
हो लवकर लागू करा