
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे
मुंबई : निसर्ग, सर्जनशीलता आणि भक्तीचा अनोखा संगम साधणारी ७½ फूट उंच ‘प्रकृती गणेश’ मूर्ती यंदा रायपाडा, उंदरई रोड मालाड पश्चिम येथील श्री गणेश मित्र मंडळाने साकारली आहे. कापसापासून तयार करण्यात आलेली ही पर्यावरणपूरक गणेशमूर्ती ‘मातीपासून कापूस, कापसापासून कला आणि कलेतून गणेश’ हा अनोखा प्रवास अधोरेखित करते.
माता धरणीच्या कुशीतून कापसाच्या रूपाने प्राप्त झालेला हा निसर्गदत्त घटक मानवी सर्जनशीलता आणि भक्तीच्या माध्यमातून गणेशाच्या दिव्य रूपात साकारण्यात आला आहे. पृथ्वीवर विराजमान असलेल्या या गणेशमूर्तीच्या संकल्पनेत ग्लोबवर भारताचे दर्शन घडविण्यात आले असून, महाराष्ट्र भगव्या रंगात ठळकपणे दर्शविण्यात आला आहे. याच भागातून कापसाची रोपे उगवून ती गणेशाच्या चरणांपर्यंत पोहोचताना दाखविण्यात आली आहेत.
ग्लोबच्या खाली पसरविण्यात आलेला कापूस हा माता धरणीची निसर्गदत्त देणगी दर्शवितो, तर त्यातून साकारलेली गणेशमूर्ती मानवी सर्जनशीलता, भक्ती आणि निसर्गाप्रती आदराचे प्रतीक ठरते.
‘धरती → कापूस → कला → गणेश’ या संकल्पनेतून साकारलेला हा देखावा गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत आहे. निसर्गाचा आदर आणि संवर्धन केल्यास त्यालाच देवत्व प्राप्त होते, हा संदेश या अनोख्या ‘प्रकृती गणेशा’तून देण्यात आला आहे.
Wow nice