
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
पारंपरिक मच्छिमारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री Piyush Goyal यांनी मच्छिमारांसाठी ‘मच्छिमार कल्याणकारी योजना’ तयार करून पेट्रोलियम पदार्थ (डिझेल, केरोसीन आदी) सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
नॅशनल फिशवर्कर्स फोरम (NFF) आणि महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती (MMKS) यांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, नवी दिल्ली येथे पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत मच्छिमारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल आणि MMKS अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सांगितले की, मार्च २०२६ मध्ये मच्छिमारांना पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीचा मोठा फटका बसला होता. मच्छिमारांना ‘बल्क’ श्रेणीत टाकल्याने डिझेलचा दर प्रति लिटर सुमारे १५५ रुपयांपर्यंत गेला होता, तर त्याच वेळी पेट्रोल पंपावर डिझेलचा दर ९०.०७ रुपये इतका होता.
या संदर्भात शिष्टमंडळाने ३० मार्च २०२६ रोजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री Hardeep Singh Puri यांची भेट घेतली होती. तसेच केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री Rajiv Ranjan Singh यांच्याकडेही निवेदन देऊन भेटीची मागणी करण्यात आली आहे.
MMKS सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले की, २०१२ आणि २०२२ मध्येही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. २०२२ मध्ये तत्कालीन मत्स्यव्यवसाय आणि पेट्रोलियम मंत्र्यांनी मच्छिमारांच्या मागणीनुसार मच्छिमार कल्याणकारी योजना तयार करून त्याअंतर्गत सवलतीच्या दरात डिझेल व केरोसीन उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याच मागणीचा पुनरुच्चार आज करण्यात आला.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी मच्छिमारांची मागणी रास्त असल्याचे सांगत, संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. पुढील दहा दिवस आपण परदेश दौऱ्यावर असलो तरी अधिकारी संपर्कात राहतील आणि मत्स्यव्यवसाय मंत्र्यांची बैठक झाल्यास मच्छिमार प्रतिनिधींना सहभागी करून घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या बैठकीला अधिकारी अजय बहाद्दर, त्यांचे सहकारी अधिकारी तसेच MPEDA चे अधिकारी उपस्थित होते.
शिष्टमंडळात NFF अध्यक्ष रामकृष्ण तांडेल, MMKS अध्यक्ष लिओ कोलासो, सरचिटणीस किरण कोळी, भाटीचे अध्यक्ष राजीव कोळी, मढ दर्यादीपचे अध्यक्ष रविंद्र कोळी, उत्तन वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विन्सन बांड्या तसेच NFF व MMKS चे प्रतिनिधी सहभागी झाले होते.अशी माहिती- किरण कोळी -सरचिटणीस, MMKS
खुप छान जर अशी योजना बनते आणि अमलत आली तर