
एसएमएस -प्रतिनिधी –उत्कर्ष बोरले
मुंबईतील सर्व २२७ वॉर्डमध्ये “कायदेशीर वॉर्ड बाल संरक्षण समिती” स्थापन करण्यात यावी, अशी मागणी भाकर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांकडे केली आहे.
भाकर फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी आज महापौर मा. रितू तावडे तसेच विरोधी पक्षनेत्या मा. किशोरीताई पेडणेकर यांची भेट घेत निवेदन सादर केले. राज्यात वाढत्या बाल लैंगिक शोषणाच्या घटना आणि बालसुरक्षेच्या गंभीर प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाच्या १० जून २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार वॉर्ड बाल संरक्षण समित्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच मुंबईतील सर्व २२७ नगरसेवकांना बालहक्क आणि POCSO कायद्याविषयी विशेष प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.
महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्यासोबत बालकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. महापौरांनी हा विषय तातडीने अमलात आणण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. तर किशोरीताई पेडणेकर यांनी हा विषय सभागृहात मांडून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनासोबत विधायक भरती संस्थेने तयार केलेली “बाल संरक्षण समिती माहिती पुस्तिका” देखील भेट देण्यात आली.
यावेळी भाकर फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. दिपक सोनवणे, नगरसेविका प्रितीताई साटम, कुर्ला येथील नगरसेविका प्रविणाताई मोरजकर, स्वीकृत नगरसेविका माधुरीताई मांजरेकर, तसेच भाकर फाउंडेशनचे नामदेव येडगे, सुमित कांबळे आणि मयूर जाधव उपस्थित होते.

Gd