
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आणि कोकण जनविकास समितीचे खंदे समर्थक दिनेश राणे यांची ताडदेव येथील जनता केंद्र या संस्थेच्या अध्यक्षपदी तर ऋतूराज तावडे यांची कार्यकारी विश्वस्त म्हणून निवड झाली आहे.
ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते विश्वनाथ मलुष्टे यांच्या निधनामुळे अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. त्याजागी तरुण समाजवादी कार्यकर्ते असलेल्या दिनेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. राणे हे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कार्यकारिणीचेही सदस्य आहेत. जनता केंद्र ही ताडदेव परिसरातील समाजवादी परिवारातील ७२ वर्षांपूर्वी स्थापन झालेली नामवंत सामाजिक संस्था असून अनेक सामाजिक चळवळींचे केंद्र राहिली आहे. संस्थेची मोठी इमारत असून तेथे सुमारे ३० हजार पुस्तके असलेले ग्रंथालय आहे. याशिवाय संस्था ताडदेव विभागात विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. विभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, परिसरातील जनतेसाठी वृत्तपत्र, मासिके, साप्ताहिके मोफत उपलब्ध करून दिली जातात. विभागातील गरीब मुलांसाठी अत्यल्प दरात बालवाडी चालविली जाते.
योग प्रशिक्षण वर्ग व भरतनाट्यमचे वर्ग त्याचप्रमाणे रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत नेत्र चिकित्सा शिबीर, दिवाळीत ग्रंथ प्रदर्शन असे विविध उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात.
Congrats