खर्गे यांच्या अपमानाचा काँग्रेसकडून निषेध; वांद्रेत निदर्शने..

Share

एसएमएस -प्रतिनिधी – उत्कर्ष बोरले.


मुंबई : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करण्यात आल्याच्या प्रकाराचा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने तीव्र निषेध केला.

या घटनेच्या निषेधार्थ उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यातील वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात जातीयवादी मानसिकतेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हजारो वर्षांपासून दलित आणि मागासवर्गीय समाजाला भेदभाव व हीन वागणुकीचा सामना करावा लागला आहे. आजही काही प्रवृत्ती अशाच मानसिकतेतून समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, समान संधी आणि सन्मानाचा अधिकार दिला असून, जातीयवादी प्रवृत्तींचा विरोध करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलनादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करण्यात आला. तसेच निषेधाचे प्रतीक म्हणून ‘चरणामृत’ संबंधितांना पाठविण्याची घोषणा करण्यात आली.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष रमेश पवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खर्गे यांच्या अपमानाचा निषेध करत संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि सर्व समाजाला समान सन्मान मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *