पालिकेचे कार्यालय की कचरा पेटी?; पी-पश्चिम कार्यालयातील अस्वच्छतेचा कळस…

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.


मुंबई : मालाड पश्चिमेतील मुंबई महापालिकेच्या पी-पश्चिम विभागाच्या प्रशासकीय कार्यालयातच अस्वच्छतेने कळस गाठला असून, पालिकेचे कार्यालय की कचरा पेटी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. कार्यालयाच्या इमारतीतील संरक्षण जाळीवर पान-मावा खाऊन थुंकल्याने संपूर्ण जाळी थुंकीने रंगली आहे. विशेष म्हणजे ही जाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांच्या कार्यालयासमोरच असल्याने प्रशासनाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पी-पश्चिम विभागाच्या मुख्य इमारतीतून पालिकेचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज चालते. या कार्यालयात विविध कामांसाठी येणारे नागरिक, पालिका कर्मचारी, लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ये-जा करतात. मात्र, याच इमारतीत पान-मावा खाऊन सर्रास थुंकण्यात येत असल्याने परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे.
विशेष म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे किंवा अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या विभागाच्या कार्यालयासमोरच थुंकीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नियम सामान्य नागरिकांसाठीच आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
सर्व्हर रूमसमोर कबुतरांचा विळखा
पालिकेच्या याच इमारतीतील सर्व्हर रूमच्या प्रवेशद्वारावर कबुतरांनी घरटे केले असून, सर्व्हर रूमसमोरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात कबुतरांची विष्ठा साचली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


पालिकेच्या इमारतीची देखभाल, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागांचे अधिकारी नेमके काय करतात, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. सामान्य नागरिकाने रस्त्यावर थुंकल्यास अथवा कचरा टाकल्यास कारवाई करणाऱ्या पालिकेच्या प्रशासनिक इमारतीतच अशा प्रकारे अस्वच्छता निर्माण होत असेल, तर कारवाई कोण करणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
या प्रकाराची दखल घेऊन पी-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त, संबंधित उपायुक्त, सहआयुक्त तसेच पालिका आयुक्त यांनी तातडीने पाहणी करून स्वच्छता व्यवस्था सुधारावी आणि कार्यालय परिसरात थुंकणाऱ्यांवर तसेच अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाह रे पालिका सामान्यांवर दंडात्मक कारवाई आणि स्वतःच टी चूक करत असेल तर कारवाई तरी कोण करणार? पालिका आयुक्त, महापौर यांच्यावर कारवाई करणार? पी -पश्चिम प्रभाग अध्यक्ष, आमदार, खासदार आणि नगरसेवक या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणार?-उत्कर्ष बोरले -सामान्य नागरिक.


Share

One thought on “पालिकेचे कार्यालय की कचरा पेटी?; पी-पश्चिम कार्यालयातील अस्वच्छतेचा कळस…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *